पालघर, 30 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. त्यावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. आज मी माझ्या आराध्य दैवताच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांच्या कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
https://x.com/AHindinews/status/1829455673182331124?s=19
पंतप्रधान काय म्हणाले?
“आजच्या या कार्यक्रमाबद्दल बोलण्यापूर्वी मला माझ्या मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत. 2013 मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते, तेव्हा सर्वप्रथम मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले होते. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडले त्याबद्दल, माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. आज मी माझ्या आराध्य दैवताच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पुतळा दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन
दरम्यान, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी तसेच शिवप्रेमींनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यासंदर्भात विरोधकांकडून राज्यभरात विविध प्रकारचे आंदोलने केली जात आहेत. याप्रकरणी पुतळ्याचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी चेतन पाटीलला ताब्यात घेतले आहे. तर जयदीप आपटे अद्याप फरार आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. तसेच राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.