पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला राजीनामा!

दिल्ली, 05 जून: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या 240 जागा जिंकल्या. परंतू, यंदा भाजपला 272 चा बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे भाजपला देशात सरकार स्थापन करताना एनडीए मधील मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज पडणार आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीनंतर देशात आता नवीन सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

https://twitter.com/ANI/status/1798277761624338789?s=19

मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

त्यानुसार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पदावर राहण्याची विनंती केली. याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाने दिली आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाची 17 वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. त्याच्या आधी देशात नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

एनडीए-इंडिया आघाडीची स्वतंत्र बैठक

दरम्यान, आजच्या दिवशी एनडीएच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार स्थापनेबाबत चर्चा होणार आहे. त्यासाठी भाजपने त्यांच्या सर्व मित्रपक्षातील प्रमुख नेत्यांना आज दिल्लीत बोलावले आहे. तर इंडिया आघाडीची देखील आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दोन्ही बैठकांमध्ये कोणती रणनीती ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *