पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जारी

वाराणसी, 18 जून: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा 17 वा हप्ता आज जारी केला आहे. यावेळी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 9.25 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 17 व्या हप्त्याची रक्कम जमा केली आहे. तसेच या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते कृषी सखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 30 हजारांहून अधिक बचत गटांना प्रमाणपत्रांचे देखील वाटप करण्यात आले. याप्रसंगी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवर उपस्थित होते.

https://x.com/AHindinews/status/1803032461305405780?s=19

17 वा हप्ता ट्रान्सफर!

तत्पूर्वी, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देशभरातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. दरम्यान, पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये मिळतात.

3.24 लाख कोटींहून अधिक रक्कम…

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी ही केंद्रीय क्षेत्रातील महत्वपूर्ण योजना आहे. ही योजना सर्वप्रथम 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार ही योजना राबवत आहे. केंद्र सरकारने किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.24 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *