मुंबई, 13 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी 29,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये ठाणे बोरिवली ट्विन बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील बोगद्याच्या कामाची पायाभरणी, नवी मुंबईत तुर्भे येथे कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचे लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
https://x.com/PIB_India/status/1811743932101083545?s=19
पंतप्रधान आज सायंकाळी मुंबईत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5.30 वाजता मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 7 वाजता मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन करतील. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 16,600 कोटी रुपयांच्या ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे. ठाणे आणि बोरिवली दरम्यानचा हा ट्विन ट्यूब बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार असून, बोरिवलीच्या बाजूने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाण्याच्या बाजूने ठाणे घोडबंदर रोड दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या प्रकल्पाची एकूण लांबी 11.8 किलोमीटर आहे. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास 12 किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाच्या वेळेत सुमारे 1 तासाची बचत होईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
विविध प्रकल्पांचे लोकार्पण-पायाभरणी
तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरेगाव मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पात बोगद्याच्या कामाची पायाभरणी करतील. या प्रकल्पासाठी 6,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर नवी मुंबईत कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत. याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी हे यावेळी त्यांच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ करतील. ज्यासाठी एकूण 5,600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.