मुंबई, 30 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शुक्रवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात मुंबई आणि पालघरला भेट देणार आहेत. त्यानुसार सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुंबईत आगमन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2024 ला हजेरी लावली. याप्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2024 मध्ये सत्कार करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधानांनी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ला संबोधित केले.
https://x.com/AHindinews/status/1829405138622300333?s=19
https://x.com/AHindinews/status/1829417827901510123?s=19
AI च्या गैरवापराबाबत…
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी AI च्या गैरवापराबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. AI च्या गैरवापराबद्दल तुमच्या चिंता देखील मला समजतात, म्हणूनच भारताने AI च्या नैतिक वापरासाठी जागतिक फ्रेमवर्क तयार करण्याचे आवाहन केले आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. भारतात सध्या सणासुदीचा हंगाम आहे आणि आपण नुकतीच जन्माष्टमी साजरी केली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत आणि बाजारपेठेतही उत्सवाचे वातावरण आहे. हे आपण आनंदाने पाहत आहोत. या सणासुदीच्या काळात हा ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2024 आयोजित करण्यात आली आहे आणि ते ही आमच्या स्वप्नांच्या मुंबई नगरीत होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करताना म्हटले आहे.
https://x.com/AHindinews/status/1829416235928277430?s=19
53 कोटींहून अधिक लोकांनी बँक खाती उघडली
गेल्या 10 वर्षांत फिनटेक स्पेसमध्ये 31 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. आमचे फिनटेक स्टार्टअप 500 टक्क्यांनी वाढले आहे, असे पंतप्रधान म्हणाले आहेत. आजच्या काळात 18 वर्षांवरील क्वचितच कोणी भारतीय असेल ज्याच्याकडे डिजिटल ओळख म्हणजे आधार कार्ड नाही. आज 53 कोटींहून अधिक लोकांची जन धन बँक खाती आहेत. याचा अर्थ गेल्या 10 वर्षांत आम्ही संपूर्ण युरोपियन युनियन इतकी लोकसंख्या बँकिंग प्रणालीशी जोडली आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. जनधन, आधार आणि मोबाईल या त्रिमूर्तीने आणखी एका परिवर्तनाला चालना दिली आहे. एकेकाळी लोक म्हणायचे की रोख व्यवहार हा राजा आहे. परंतु आज जगातील जवळजवळ निम्मे रिअल-टाईम डिजिटल व्यवहार भारतात होतात. भारताचा UPI हे जगभरातील फिनटेकचे उत्तम उदाहरण बनले आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पालघर मध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 1.30 वाजता पालघर मधील सिडको मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते वाधवन बंदराची पायाभरणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे 76,000 कोटी रुपये आहे. मोठ्या कंटेनर जहाजे आणि अति-मोठ्या मालवाहू जहाजांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किनारपट्टी खोल करून देशाच्या व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, वाधवन बंदरामुळे भारताचा सागरी संपर्क वाढेल. तसेच पालघरमध्ये पंतप्रधान मोदी सुमारे 1,560 कोटी रुपये खर्चाच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यासोबतच पंतप्रधान अंदाजे 360 कोटी रुपये खर्चून नॅशनल रोल आउट ऑफ शिप कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टीम लॉन्च करतील.