सोलापूर, 19 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) सोलापूर जिल्ह्यातील रे नगर मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 30 हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे लोकार्पण आज संपन्न झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावीचे वाटप करण्यात आले. याच सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते अमृत 2.0 योजनेतील राज्यातील 4 महानगर पालिका आणि 3 नगरपालिकांच्या एकूण 1201 कोटी रुपयांच्या 7 पाणीपुरवठा आणि एका मलनिस्सारण प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पीएम स्वनिधी लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात निधी हस्तांतरण प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना संबोधित केले.
https://twitter.com/AHindinews/status/1748222151549993167?s=19
एक लाखाहून अधिक कुटुंबांचा गृहप्रवेश सोहळा होत आहे: नरेंद्र मोदी
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी मी काही संतांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या नियमांमध्ये व्यस्त असून, त्यांचे मी काटेकोरपणे पालनही करतो. महाराष्ट्रातील नाशिकच्या पंचवटीच्या भूमीतून त्याची सुरुवात झाली हाही योगायोगच म्हणावा लागेल. आज या रामभक्तीमय वातावरणात महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक कुटुंबांचा गृहप्रवेश सोहळा होत आहे. महाराष्ट्रातील ही एक लाखाहून अधिक कुटुंबे 22 जानेवारी रोजी संध्याकाळी त्यांच्या पक्क्या घरात रामज्योती प्रज्वलित करतील.”
https://twitter.com/AHindinews/status/1748226737694261256?s=19
पंतप्रधान मोदी भावूक झाले
“सोलापूरच्या हजारो गोरगरीब, कष्टकऱ्यांसाठी आम्ही घेतलेला संकल्प आज पूर्ण होत आहे, याचा मला आनंद आहे. आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले. आज ते पाहून परत आलो आणि वाटले की मलाही लहानपणी अशा घरात राहण्याची संधी मिळाली असती.” असे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावूक झाले होते. त्यावेळी त्यांनी काही सेकंद मध्येच आपले भाषण थांबवले. पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, “या सगळ्या गोष्टी बघून मला खूप समाधान वाटतं. जेव्हा या हजारो कुटुंबांची स्वप्ने साकार होतील, तेव्हा त्यांचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे.”
https://twitter.com/AHindinews/status/1748228934884606142?s=19
देशातील गरिबांना सक्षम बनवणार: मोदी
“आमचे सरकार पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे की, श्रीरामाच्या आदर्शांचे पालन करून देशात चांगले प्रशासन व्हावे आणि देशात प्रामाणिकपणाचे राज्य व्हावे. रामराज्यानेच सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांच्या प्रयत्नाला प्रेरणा दिली आहे. आपल्या देशात गरिबी हटावचा नारा बराच काळ दिला गेला, पण गरिबी हटली नाही. गरिबांच्या नावावर योजना केल्या, पण त्याचा लाभ गरिबांना मिळाला नाही. गोरगरिबांचे पैसे मध्यस्थ लुटायचे. आधीच्या सरकारांची धोरणे, हेतू आणि निष्ठा या गोत्यात होत्या. आमचा हेतू स्पष्ट आहे आणि आमचे धोरण गरिबांना सक्षम बनवण्याचे आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.