G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत दाखल

इटली, 14 जून: (विश्वजीत खाटमोडे) इटलीतील अपुलिया शहरात G7 शिखर परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला रवाना झाले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात एनडीएचे सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. दरम्यान, G7 परिषदेच्या आउटरीच सत्रात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज इटलीतील अपुलिया शहरात पोहोचले आहेत. G7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. तसेच ते यावेळी अनेक देशांच्या पंतप्रधानांसोबत चर्चा करणार आहेत. 

https://twitter.com/narendramodi/status/1801376022174257282?s=19

विमानतळावर मोदींचे स्वागत

यावेळी इटलीतील भारताचे राजदूत वाणी राव आणि इतर अधिकाऱ्यांनी अपुलिया येथील ब्रिंडिसी विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. G7 शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी इटलीला पोहोचले. जागतिक नेत्यांसोबत उत्पादक चर्चा करण्यास उत्सुक आहोत. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचे आमचे ध्येय असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1801242566395937269?s=19

नरेंद्र मोदींनी निवेदनात काय म्हटले?

दरम्यान, इटलीतील G7 शिखर परिषदेला जाण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निवेदन जारी केले होते. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून, मी 14 जून रोजी G7 आउटरीच शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीमधील अपुलिया शहरात जात आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये म्हटले आहे. मला याचा आनंद आहे की, पंतप्रधान पदाच्या सलग तिसऱ्या कार्यकाळात माझी पहिली भेट इटलीतील G7 शिखर परिषदेसाठी आहे. 2021 मधील G-20 शिखर परिषदेसाठी मी इटलीला भेट दिली आहे, याची मला आठवण आहे. पंतप्रधान मेलोनी यांच्या गेल्या वर्षीच्या दोन भारत भेटी आमच्या द्विपक्षीय कार्यसूचीला गती आणि सखोलता प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या. भारत-इटली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक आणि भूमध्यसागरीय क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

आउटरीच सत्रातील चर्चेदरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरावर लक्ष केंद्रित केले जाईल. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेचे परिणाम आणि आगामी G7 शिखर परिषद यांच्यात अधिक समन्वय आणण्याची आणि जागतिक दक्षिणेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्याची ही एक संधी असेल. मी शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या इतर नेत्यांना भेटण्यास उत्सुक आहे, असे नरेंद्र मोदी यांनी यात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *