नवी दिल्ली, 23 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत देशातील सुमारे एक कोटी घरांवर सोलर रूफ टॉप यंत्रणा बसवली जाणार आहे. या योजनेचा फायदा थेट गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना होईल. त्यामुळे त्यांचे वीज बिल कमी होण्यास मदत होणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1749415140662055073?s=19
देशातील 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसवण्याचे लक्ष्य: पंतप्रधान
“जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमी ऊर्जा मिळते. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी, हा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे. अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे. आमचे सरकार 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसवण्याचे लक्ष्य घेऊन ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, शिवाय ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल,” असे पंतप्रधान मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
वीज बिल कमी होण्यास मदत होणार!
दरम्यान प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत केंद्र सरकार मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांच्या घरावर रूफ टॉप यंत्रणा बसवणार आहे. सूर्यकिरणांमधून ऊर्जा शोषून वीजनिर्मिती करणारे हे तंत्रज्ञान आहे. यामध्ये सौर ऊर्जेला विजेमध्ये रूपांतरित केले जाणार आहे. ही वीज पॉवर ग्रीडमधून येणाऱ्या विजेप्रमाणेच काम करते. मात्र, पॉवर ग्रिडमधून मिळणाऱ्या विजेच्या तुलनेत ते स्वस्त आणि सोयीस्कर आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी घरांचे वीज बिल कमी होण्यास मदत होणार आहे.