नवी दिल्ली, 12 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी रामलल्लाच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या दिवसाची रामभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. तर या सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास ऑडिओ संदेश जारी केला आहे. यामध्ये मोदी यांनी आपण आजपासून येत्या 22 जानेवारीपर्यंत 11 दिवसांचा विशेष अनुष्ठान सुरू करणार असल्याचे म्हटले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1745652236393558482?s=19
या पोस्टमध्ये मोदींनी काय म्हटले?
“अयोध्येतील रामललाच्या अभिषेक सोहळ्याला अवघे 11 दिवस उरले आहेत. या शुभ सोहळ्याचा मी देखील साक्षीदार होणार हे माझे भाग्य आहे. अभिषेक करताना भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परमेश्वराने मला एक साधन बनवले आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांचा विशेष अनुष्ठान सुरू करत आहे. मी तुम्हा सर्वांचे, जनतेचे आशीर्वाद मागत आहे. या क्षणी, माझ्या भावना शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे, परंतु मी माझ्या बाजूने प्रयत्न केला आहे. असे नरेंद्र मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन
दरम्यान, प्रभू श्री रामाच्या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी विविध पक्षांचे नेते, साधू संत आणि अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक लोक अयोध्येत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, याठिकाणी सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात येणार आहे.
अयोध्येत मोठी सुरक्षा व्यवस्था!
यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तयारी केली आहे. सध्या अयोध्येकडे जाणारे सर्व रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून सध्या अयोध्येच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर नजर ठेवण्यात येत आहे. याशिवाय कार्यक्रमाच्या दिवशी येणाऱ्या सर्व भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, म्हणून उत्तम व्यवस्था करण्यात येणार आहे.