दिल्ली, 8 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल विधानसभेत महिलांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. भारतीय आघाडीतील घामांडिया अलायन्सच्या एका मोठ्या नेत्याने काल विधानसभेत महिलांबद्दल अपशब्द वापरले. त्यांना याची लाज वाटत नाही. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात इंडिया आघाडीचा एकपण नेता बोलला नाही. असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ते आज मध्य प्रदेशातील दमोह आणि गुना येथे जाहीर सभेत बोलत होते.
त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “इंडिया आघाडीच्या नेत्याने विधानसभेत अशा भाषेत अश्लील गोष्टी बोलल्या, याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. त्या ठिकाणी माता-भगिनी देखील उपस्थित होत्या. याची त्यांना लाज नाही. एवढेच नाही तर माता-भगिनींच्या या झालेल्या अपमानाविरुद्ध इंडिया आघाडीचा एकपण नेता बोलला नाही.” जे लोक स्त्रियांबद्दल असा विचार करतात, ते तुमच्यासाठी चांगले काही करू शकतात का? ते तुमची इज्जत वाचवू शकतात का? असे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच, “तुम्ही किती खाली पडाल? जगभरात तुम्ही देशाचा अपमान करत आहात. हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. माझ्या माता आणि भगिनींनो, तुमचा सन्मान करण्यासाठी माझ्याकडून जे काही करता येईल ते करणार. याबाबत मी कधीही मागे हटणार नाही.” असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल विधानसभेत जनगणनेच्या अहवालावर झालेल्या चर्चेदरम्यान महिलांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. “एक सुशिक्षित महिला ही आपल्या पतीला विरोध करु शकते. ज्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात राहू शकते.” असे त्यांनी विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून देशाच्या राजकारणात मोठा गदारोळ झाला आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी त्यांच्या या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करीत माफी मागितली आहे. “मी महिलांच्या शिक्षणाबद्दल बोलत होतो. त्यावेळी माझ्या तोंडून हे चुकीचे शब्द बाहेर पडले. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो”, असे नितीश कुमार म्हणाले आहेत. ते विधानसभेत बोलत होते.
One Comment on “पंतप्रधान मोदींनी घेतला नितीश कुमार यांचा समाचार”