राष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू! असा असणार दौरा

पुणे, 02 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. 2 ते 4 सप्टेंबर असा त्यांचा दौरा असणार आहे. या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि लातूर येथील नियोजित कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. या दौऱ्याची माहिती राष्ट्रपती भवन कार्यालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

राष्ट्रपती उद्या पुण्याच्या दौऱ्यावर

त्यानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज (दि.02) सर्वप्रथम कोल्हापूरला भेट देतील. त्यावेळी राष्ट्रपती कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील श्री वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर उद्या (दि.03) राष्ट्रपती पुणे शहराच्या दौऱ्यावर जातील. पुणे शहरातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा 21 वा दीक्षान्त समारंभ उद्या आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी राष्ट्रपती आपल्या भाषणातून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

या कार्यक्रमांत सहभागी होणार

या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या लगेचच मुंबईकडे रवाना होतील. यावेळी राष्ट्रपती मुंबई येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमानंतर लातूरला भेट देतील. त्यावेळी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे 4 सप्टेंबर रोजी बुद्ध विहाराचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच यावेळी उदगीर येथे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्याला राष्ट्रपती संबोधित करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *