नवी दिल्ली, 26 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (दि.26) कर्तव्य पथावर राष्ट्रीय ध्वज फडकवून भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला सुरूवात केली. यावेळी 21 तोफांच्या सलामीनंतर परेडला प्रारंभ झाला. या सोहळ्यात इंडोनेशियाच्या सैन्याने देखील सहभाग नोंदवला. देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो उपस्थित होते.
https://x.com/AHindinews/status/1883380935619698927?t=ArWPI481WgaNMNDP2IRDmw&s=19
‘पारंपरिक बग्गी’ची प्रथा पुन्हा सुरू
प्रजासत्ताक दिनाच्या परंपरेनुसार, भारताच्या राष्ट्रपती मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना भारतीय सैन्याच्या ‘राष्ट्रपती अंगरक्षक’ तुकडीने कर्तव्य पथावर आणले. विशेष म्हणजे, 40 वर्षांपूर्वी बंद झालेली ‘पारंपरिक बग्गी’ची प्रथा यावेळी पुन्हा सुरू करण्यात आली आणि दोन्ही राष्ट्रपती बग्गीतून समारंभस्थळी पोहोचले.
https://x.com/AHindinews/status/1883380458068795610?t=KLebfIgP79mls6Pt7nZ7lg&s=19
21 तोफांची सलामी
यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य पथावर दोन्ही राष्ट्रपतींचे तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड व त्यांच्या पत्नी सुदेश धनखड यांचे स्वागत केले. सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रपती मुर्मू यांनी कर्तव्य पथावर तिरंगा फडकवला. यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर स्वदेशी 105 मिमी लाइट फील्ड गनचा वापर करून 21 तोफांची सलामी देण्यात आली.
https://x.com/AHindinews/status/1883385870608445627?t=-1yrjnzXRQpgq3DLRdmYZQ&s=19
इंडोनेशियाच्या सैन्याचा सहभाग
प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्यात भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे, एकतेचे, समानतेचे, विकासाचे आणि सैन्यशक्तीचे दर्शन घडवण्यात आले. सांस्कृतिक मंत्रालयाच्या 300 कलाकारांनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने परेडमध्ये सहभाग घेतला. शहनाई, नादस्वरम, मशक बीन, बासरी, शंख आणि ढोल यांसारख्या वाद्यांच्या सुरेल आवाजात ‘सारे जहां से अच्छा’ हे गीत सादर करण्यात आले. सोबतच प्रजासत्ताक दिनाच्या या समारंभात इंडोनेशियाच्या 152 सदस्यांच्या राष्ट्रीय सशस्त्र दलांच्या मार्चिंग तुकडीने आणि 190 सदस्यांच्या सैन्य अकादमी बँडने परेडमध्ये सहभाग नोंदवला, ज्यामुळे सोहळ्याची भव्यता अधिकच वाढली.