पुणे, 29 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या आज 4 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत असणार आहे. याची माहिती राष्ट्रपती भवनाने त्यांच्या निवेदनातून दिली आहे. या निवेदनानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यात येणार आहेत. यावेळी लोणावळा येथील कैवल्यधामच्या शताब्दी वर्ष सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित ‘शालेय शिक्षण प्रणालीमध्ये योगाचे एकीकरण-विचार प्रकट करणे’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वतीने शहरात वाहतुकीचे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.
अवकाळी पावसामुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर शेती पिकांचे नुकसान – मुख्यमंत्री शिंदे
त्यानंतर आज सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत होणाऱ्या डिनरला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्याचा आढावा घेणार आहेत. तसेच त्या याठिकाणी 5 व्या बटालियनच्या इमारतीची पायाभरणीही करणार आहेत.
या कार्यक्रमानंतर 1 डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुण्याच्या वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी या वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूरला प्रस्थान करतील. यावेळी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी द्रौपदी मुर्मू या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याला अटक
One Comment on “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आजपासून 4 दिवसीय महाराष्ट्र दौरा”