पुणे, 29 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 3 सप्टेंबर रोजी पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे आदेश पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्यानुसार, पुणे शहरातील सिम्बायोसिस विद्यापीठ परिसरातील शाळा त्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याचवेळी पुणे शहर आणि जिल्ह्यासह तसेच पिंपरी-चिंचवड शहरात खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
https://x.com/Info_Pune/status/1828793489104261405?s=19
https://x.com/Info_Pune/status/1828794529295777963?s=19
https://x.com/Info_Pune/status/1828794531636228279?s=19
सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने येत्या 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत पुणे शहरातील सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 2 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 3 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या आदेशांचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
गेल्या महिन्यातील दौरा रद्द झाला होता
याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 28 आणि 29 जुलै रोजी पुणे दौऱ्यावर येणार होत्या. परंतु, काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रपती आता येत्या 3 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुणे दौऱ्याची तयारी केली जात आहे.