राजगड, 03 जून: (विश्वजीत खाटमोडे) मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पिपलोदी येथे मध्यरात्री उशीरा ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन 13 जणांचा मृत्यू झाला. तर या अपघातात 15 जण जखमी झाले आहेत. जखमींवर राजगड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच काही गंभीर जखमी रुग्णांना भोपाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ट्रॅक्टरमधून राजस्थानहून मध्यप्रदेशच्या राजगड येथे येत होते. त्यावेळी राजस्थान-राजगड सीमेजवळ पिपलोदी येथे त्यांचा ट्रॅक्टर उलटला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 मुलांचा समावेश आहे.
https://twitter.com/ANI/status/1797337299757207966?s=19
दोघांची प्रकृती चिंताजनक
दरम्यान, या अपघातातील जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना भोपाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमींवर शासनाच्या सूचनेनुसार योग्य उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती राजगडचे जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित यांनी दिली आहे. या अपघाताचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. हा अपघात झाल्यानंतर स्थानिक लोक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. तसेच त्यांनी या अपघाताची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1797344545321181646?s=19
द्रौपदी मुर्मू यांचे ट्विट
मध्य प्रदेशातील राजगड येथे झालेल्या रस्ते अपघातावर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. “मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यात रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करते आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते,” असे राष्ट्रपतींनी यामध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/DrMohanYadav51/status/1797333645608538332?s=19
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
राजगड दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ट्विट केले आहे. “राजगढ जिल्ह्यातील पिपलोदी रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील 13 लोकांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. राजस्थान सरकार आणि राजस्थान पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत आणि काही गंभीर जखमींना भोपाळला पाठवले आहे, मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.” असे ते यामध्ये म्हणाले.