शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची रायगडावर उपस्थिती

रायगड, 20 जून: (विश्वजीत खाटमोडे) किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. त्यानिमित्त रायगडावर आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज रायगडावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते छत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. याप्रसंगी, यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1803690183608651824?s=19

गडकिल्ल्यांचे संवर्धन करणार – मुख्यमंत्री

यावेळी ढोल ताशांच्या गजरात पालखीचे राजसदरेवर आगमन झाले. त्यानंतर उपस्थित सर्व नेत्यांनी शिवछत्रपतींच्या मूर्तीला अभिवादन केले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शिवप्रेमींना संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील तमाम शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याला राज्य सरकारची प्राथमिकता असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

https://x.com/mieknathshinde/status/1803713940855402823?s=19

वारकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय

तसेच राज्यातील सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार आहे. राज्यात देव, देश, धर्म आणि स्वाभिमान जपत राज्यकारभार सुरू आहे. शिवछत्रपतींच्या कल्पनेतील लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना 5 लाख रुपयांचे विमा कवच आणि प्रत्येक मानाच्या दिंडीला 20 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती दिली.

जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज राज्यभरातून नव्हे तर देशभरातून अनेक शिवभक्त रायगडावर येत असतात. या सोहळ्यासाठी आलेल्या शिवभक्तांसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रायगडावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. याशिवाय शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दरवर्षी रायगडावर अनेक राजकीय नेते येत असतात. त्यांच्या सुरक्षेची देखील काळजी प्रशासनाने घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *