पुणे, 05 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार नाकारल्यामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सबंधित डॉक्टरांचा परवाना रद्द करून कठोर कारवाई करण्याची मागणी मृत महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट आहे.
https://x.com/ANI/status/1908195444020183445?t=en_l9YtlrVn_q78bHGhDCg&s=19
मृत महिलेच्या वहिनींची प्रतिक्रिया
मृत तनिषा भिसे यांच्या वहिनी प्रियांका पाटील यांनी माध्यमांशी सांगितले की, “आम्ही तनिषाला घेऊन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झालो. डॉक्टरांनी तिचा बीपी तपासला आणि स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. काही तपासण्या कराव्या लागतील असं सांगून तिला खाऊन किंवा पिऊन नको असंही बजावलं. नंतर आम्हाला 20 लाख रुपये जमा करण्यास सांगितलं.” असे त्यांनी नमूद केले.
रुग्णालयात दाखल करण्यास नकार
“तिचा रक्तदाब वाढत होता आणि रक्तस्रावही सुरू झाला होता. आम्ही एका तासात 3 लाख रुपये गोळा करून बिलिंग विभागात गेलो, पण त्यांनी पैसे स्वीकारले नाहीत. त्यांनी सुरूवातीला सांगितलेली 20 लाख रुपयांची संपूर्ण रक्कमच हवी असल्याचा आग्रह धरला. डॉक्टरांनी तिला आधी दिलेली औषधं घेण्यास सांगितलं पण उपचार काहीच केले नाहीत,” असा आरोप मृत महिलेच्या वहिनींनी केला आहे.
कठोर कारवाईची मागणी
“आम्ही शेवटी तिला ससून रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आम्ही व्हीलचेअर स्वतः विकत घेतली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एकाही कर्मचाऱ्याने आमची मदत केली नाही. तुम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासा – तीन तास ते निष्क्रिय होते,” असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर, मृत महिलेचे दुसरे नातेवाईक अक्षय पाटील यांनी म्हटले की, “आम्ही म्हणू शकतो की त्यांनी तिची हत्या केली. ती खूप अस्वस्थ होती. डॉक्टरचा परवाना रद्द केला पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे.”
वैद्यकीय व्यवस्थेतील असंवेदनशीलता
दरम्यान या घटनेमुळे सोशल मिडिया आणि स्थानिक पातळीवर याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने आणि आरोग्य यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय व्यवस्थेतील असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे.