इंदापूर, 07 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण माने यांनी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा प्रवीण माने यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत प्रवीण माने हे सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार आहेत. याचा फटका सुप्रिया सुळे यांना बसण्याची शक्यता आहे.
माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत
माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत राहिले आहे. राज्याच्या राजकारणात अनेक बदल झालेले असल्याचे आपल्याला माहित आहे. अजित पवार यांचे हात बळकट करून त्यांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही माने परिवाराने सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी अजित पवार यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रवीण माने यावेळी म्हणाले. राज्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीचे सर्वच नेते नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे आम्ही देखील अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. असे प्रवीण माने यावेळी म्हणाले. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यात आता प्रचार सुरू होणार आहे. त्यामुळे आम्ही आजपासून प्रचार सुरू करणार आहोत, असे देखील प्रवीण माने यांनी यावेळी सांगितले.
सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार
दरम्यान, महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू केला होता. मात्र काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे इंदापुरात कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी प्रवीण माने यांच्या घरी जाऊन चहापान केले होते. त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तेंव्हापासून प्रवीण माने हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. आता प्रवीण माने यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, प्रवीण माने यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.