जितेंद्र आव्हाड यांच्या पत्राला प्रकाश आंबेडकर यांचे उत्तर! प्रकाश आंबेडकरांची भुमिका काय?

मुंबई, 05 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षाचा महाविकास आघाडीमध्ये सहभाग झालेला नाही. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये अनेक बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, अजूनही यासंदर्भातील कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहून आपण लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊ, असे आवाहन केले होते. त्यांच्या या पत्राला प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेयर केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात काय लिहिले?

“आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही, याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही. कारण या अगोदर आपल्या पक्षाने बीजेपी बरोबर समझोता केलेला होता. त्यामुळे संविधान वाचविणे ही जी आपण व्यक्तीगत जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रात म्हटले आहे.

आम्हाला संविधान वाचवायचे आहे

“आपल्या परीने आम्हाला संविधान वाचविण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे, तेवढे आम्ही संविधान वाचविण्यासाठी करत राहणार आहोत. त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तीगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की, आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही. या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगतो आहोत की, आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आले की, आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बीजेपी किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही,” असे प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रात म्हटले आहे.

तर आम्हाला खात्री करावी लागेल!

“तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, ते त्यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शविला. आपणच फक्त म्हणालात की “लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे?” ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे. त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघडउघड असे लिहून देण्यास नकार दिलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बघितले तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचे असेल, तर आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बीजेपीबरोबर जाणार नाहीत, याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तीगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल,” असे प्रकाश आंबेडकर या पत्रात  म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाडांनी पत्रात काय म्हटले होते?

मी शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार- प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर म्हणजेच आपणांकडे पाहिले जात आहे. आपणांकडे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करू इच्छितो की, तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे; अन् त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात. संविधान आणि लोकशाही हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया ! जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *