मुंबई, 05 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) नागपूर येथील दीक्षाभूमी मध्ये 200 कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येत आहेत. यामधील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला भीम अनुयायांनी विरोध केला आहे. यासाठी सोमवारी दुपारी नागपूर येथे मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी जमलेल्या आंदोलकांनी परिसरात तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यानंतर काही आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वाढता विरोध लक्षात घेता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
https://x.com/VBAforIndia/status/1809129909870342194?s=19
प्रकाश आंबेडकर यांच्या मागण्या
त्यांची ही भेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. या भेटीत प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्या केल्या. नागपूर येथील दीक्षाभूमीवर झालेल्या आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. राज्य सरकारकडून गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच गावातील शासकीय जमिनीवरील घरे हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यांना स्थगिती देण्यात यावी यांसारख्या मागण्या प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांकडून मागण्या मान्य!
या भेटीत चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकाश आंबेडकर यांच्या या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानुसार, दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलनकर्त्याला अटक केली जाणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तसेच शासकीय अतिक्रमण जमीनधारकांच्या पिकाला संरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सोबतच अतिक्रमणातील घरे पाडली जाणार नाहीत आणि त्या संदर्भातील धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.