प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात! 27 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई, 24 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर हे आता लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. येत्या 27 मार्च रोजी प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदार संघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

26 मार्च रोजी भूमिका स्पष्ट होणार

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी कालच कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठींबा असल्याचे जाहीर केले होते. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला लोकसभेच्या 7 जागांवर पाठिंबा देण्याची तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्रही लिहिले होते. प्रकाश आंबेडकर यांनी काल महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युती संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात येत्या 26 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. त्यामूळे 26 तारखेला प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपवर जोरदार टीका

यासोबतच प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपकडे उमेदवार नाही, त्यामुळेच इतर पक्षांमध्ये फूट पाडून ते कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच भाजपने चारशे पारचा दिलेला नारा हा संविधान बदलण्यासाठी आहे, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *