मुंबई, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (दि.28) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी परभणी येथील आंदोलनात अटक करण्यात आलेले सोमनाथ सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचे पडसाद राज्यभरात उमटले होते. त्यांचा मृत्यू राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता.
https://x.com/Prksh_Ambedkar/status/1872908050656317660?t=qFhVWZKlGYfaw0ENAzrYJw&s=19
प्रकाश आंबेडकरांच्या मागण्या पुढीलप्रमाणे –
1. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी.
2. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या.
3. परभणीत पोलिसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा.
4. परभणी प्रकरणात चौकशी करून ज्यांनी निरपराध नागरिकांना मारहाण केली आहे. अशा पोलिसांच्या विरोधात एफआयआर नोंदवली गेली पाहिजे.
5. आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन काही नागरिकांच्या घरांची मोडतोड करण्यात आलेली आहे. अशा नागरिकांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी.
6. 1 जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती भडकावण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत.
7. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना रद्द करा आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी.
https://x.com/Prksh_Ambedkar/status/1872955624813719864?t=kiU0NAarXWcgG40ItzDSXg&s=19
मुख्यमंत्री मागण्यांबाबत सकारात्मक
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागण्यांना गांभीर्याने घेतले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. विशेषतः परभणीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांना पुरेशी भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. निरपराध नागरिकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. आंदोलनात ज्या नागरिकांच्या घरांची मोडतोड करण्यात आली आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थांच्या डीबीटी संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून, त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.