बेंगळुरू, 31 मे: (विश्वजीत खाटमोडे) अनेक महिलांच्या लैंगिक छळाचा आरोप असलेला कर्नाटकातील जेडीएसचा निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना याला काल रात्री बेंगळुरूच्या कॅम्पागोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. विशेष तपास पथकाने प्रज्वल रेवन्ना याला ताब्यात घेतले आहे. त्याला आता कोर्टासमोर हजर करून त्याच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत त्याची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान प्रज्वल रेवन्ना यांच्यावर शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. लैंगिक छळाच्या आरोपानंतर प्रज्वल रेवन्ना हा 27 एप्रिल रोजी जर्मनीला पळून गेला होता.
https://twitter.com/AHindinews/status/1796288495389904979?s=19
https://twitter.com/AHindinews/status/1796406094878970211?s=19
एसआयटीची कारवाई
अटक केल्यानंतर प्रज्वल रेवन्नाला एसआयटीने बेंगळुरू येथील सीआयडी कार्यालयात नेले आहे. या पार्श्वभूमीवर, येथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याठिकाणी आता प्रज्वल रेवन्नाची चौकशी करण्यात येत आहे. तसेच येथे त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येईल. यासंदर्भात कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रज्वल रेवन्ना काल रात्री 12.50 वाजता जर्मनीहून आला आहे. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कायदेशीररीत्या जे करणे आवश्यक आहे ते अधिकारी करतील. मी काल शिमोगाहून आलो आहे. मी अद्याप अधिकाऱ्यांशी जे काही बोललो नाही. ते कायद्यानुसार करता येईल ते करा, असे आम्ही यापूर्वीही म्हटले आहे. एसआयटीने त्याला अटक केली असून आता कायद्यानुसार कारवाई केली जाईल.” असे ते यावेळी म्हणाले.
तब्बल 35 दिवसानंतर अटक
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवल्याच्या आरोपावरून प्रज्वल रेवन्नाच्या विरोधात विविध कलमांच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे. त्याला आज कोर्टासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर प्रज्वल रेवन्ना हा 27 एप्रिल रोजी बेंगळुरूहून जर्मनीला पळून गेला होता. त्यानंतर तो 35 दिवसांनंतर काल रात्री जर्मनीहून बेंगळुरूला परतला. विमानातून खाली उतरताच बेंगळुरू एसआयटीने त्याला अटक केली. आता याप्रकरणात प्रज्वल रेवन्नाला कोर्ट काय शिक्षा देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.