मुंबई, 29 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री रश्मिका मंदाना, डान्सर सपना चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले होते. त्यावरून अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने संताप व्यक्त केला होता. या वक्तव्याबद्दल सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी तिने शनिवारी (दि.28) पत्रकार परिषदेत केली होती. तसेच याप्रकरणी प्राजक्ता माळीने आता सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज (दि.29) दिली आहे.
https://x.com/ChakankarSpeaks/status/1873288505574760909?t=OFE1JidgJS76gZPf-fgIuQ&s=19
रुपाली चाकणकर यांची माहिती
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल, असे रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून म्हटले आहे. महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवले पाहिजे. कारण, संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत. काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करण्यासंदर्भात महिला आयोग पुढाकार घेईल, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.
सुरेश धस काय म्हणाले होते?
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांसमोर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले होते. “इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचे असेल त्यांनी परळीला यावे. तिथे त्यांनी त्याचे शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा पसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी आमच्या इथे इव्हेंटसाठी येतात,” असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आता यासंदर्भात प्राजक्ता माळी हिने सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे महिला आयोग यासंदर्भात कोणती कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.