मुंबई, 29 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोडला होता. त्यानंतर वसंत मोरे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये पुणे लोकसभा मतदार संघाच्या जागेसंदर्भांत सविस्तर चर्चा करण्यात आली. ही बैठक प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडली. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत पुणे मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वसंत मोरे वंचितकडून लढणार?
तत्पूर्वी, वसंत मोरे यांनी मनसे पक्ष सोडला होता. त्यानंतर वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून पुणे मतदार संघातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वसंत मोरे यांनी पुण्याच्या जागेवर अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. अशातच वसंत मोरे यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेतल्यामुळे त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुण्याचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पुण्यात तिरंगी लढत?
पुणे लोकसभा मतदार संघाच्या जागेवर भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच पुण्यात महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी मिळाली, तर पुणे मतदार संघात यंदा तिरंगी लढत झाल्याची पाहायला मिळणार आहे. दरम्यान, वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. ही पहिलीच बैठक असून, येत्या दोन ते तीन दिवसांत पुणे मतदार संघाच्या जागेवर निर्णय घेण्यात येईल, असे वसंत मोरे यावेळी म्हणाले.