पोर्श कार अपघात प्रकरण; ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक

पुणे, 27 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्श कार अपघात प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे, याची माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान, या अपघातावेळी हा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत त्याची कार चालवत होता. या अपघातात एक तरूण आणि एका तरूणीचा जागीच मृत्यू झाला होता.

https://twitter.com/AHindinews/status/1794928822388936959?s=19

डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलले

या अपघातानंतर आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या आरोपीने दारू घेतली आहे की नाही? याची तपासणी करण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात या आरोपीच्या रक्ताचे नमुने देण्यात आले. त्यानंतर ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या डॉक्टरांनी आरोपीच्या नातेवाईकांकडून त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय ह्या डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात दारूचा अंश सापडू नये, म्हणून त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील त्या 2 डॉक्टरांना अटक केली आहे.

पोलीस आयुक्तांची माहिती

पुणे कार अपघात प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, “19 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ससून हॉस्पिटलमध्ये घेतलेले रक्ताचे नमुने हॉस्पिटलच्या डस्टबिनमध्ये टाकण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेऊन ते पाठवण्यात आले.” दरम्यान, पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तसेच या अल्पवयीन आरोपीच्या हातात कार दिल्याप्रकरणी त्याच्या वडिलांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याशिवाय अल्पवयीन आरोपीच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याच्या आरोपातून आरोपीच्या आजोबाला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *