पुणे, 26 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत वेगात पोर्श कार चालवून एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर हा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कोर्टाने जामीन दिला होता. या मुलाला जामीन देताना कोर्टाने त्याला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या निषेधार्थ पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने भव्य राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्या वेगळ्या निबंध स्पर्धेची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान, या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला सध्या बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
व्यवस्थेची चिड येत असेल तर घरी बसून संताप करण्यापेक्षा लोकशाही मार्गाने आपला विरोध नोंदवा..
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 25, 2024
जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा.#justicefor_anishashvini #puneaccident #dhangekar_pattern pic.twitter.com/YVFdkJceHL
काँग्रेसतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन
या स्पर्धेत निबंधाचे दहा विषय देण्यात आले आहेत. पुण्यातील कल्याण नगर परिसरातील अपघातस्थळी, बॉलर पब समोर ही स्पर्धा आज सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात आली. या निबंध स्पर्धेत 11 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 7 हजार 777 रुपये असणार आहे. तृतीय क्रमांकाचे बक्षीस 5 हजार 555 रुपये आहे. तर उत्तेजनार्थ प्रत्येकी 1 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे.
या निबंध स्पर्धेतील विषय
1) माझी आवडती कार. (पोर्शे, फरारी, मर्सडिज, की इतर)
2) दारूचे दुष्परिणाम.
3) नियम पाळा, अपघात टाळा, अर्थात कायदा सर्वांना सारखा आहे.
4) आजची तरुण पिढी, अन व्यसनाधीनता.
5) माझा बाप बिल्डर असता तर?
6) रस्ते अपघात टाळण्यासाठी काय करावे ?
7) मी पोलीस अधिकारी झालो तर ..??
8) भारतात खरंच कायद्यापुढे समानता राहिली आहे का?
9) अश्विनी कोष्टा व अनिश अवधिया यांचे खरे मारेकरी कोण?
10) माझ्या स्वप्नातील पुणे शहर / असं असावं माझं पुणे शहर.