पोर्श कार अपघात प्रकरण; आरोपीला 300 शब्दांच्या निबंधाची शिक्षा देणाऱ्या दोघांची हकालपट्टी

पुणे, 11 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुरूवातीला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन राज्यनियुक्त सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. चौकशी समितीच्या शिफारशीवरून राज्याच्या महिला व बालविकास विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने एक समिती स्थापन केली होती. या चौकशीत हे दोन्ही सदस्य दोषी आढळले होते. त्यांच्यावर अधिकाराचा गैरवापर करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

https://x.com/ANI/status/1844249977792692471?t=efLIrkVYHIwIQzN_5Fsjgg&s=19

300 शब्दांचा निबंध…

या दोन सदस्यांनी पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची किरकोळ शिक्षा देऊन जामीन मंजूर केला होता. त्यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता. बाल न्याय मंडळाच्या या निर्णयामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी नव्याने आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने बाल सुधारगृहात पाठविण्याचा निर्णय दिला होता.

असा अपघात घडला होता

पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात 19 मे 2024 रोजी एका पोर्श कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील तरूण तरूणीचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून तो पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. तो या अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत पोर्श चालवत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात या अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने बाल सुधारगृहात पाठवले होते. त्यानंतर 25 जून रोजी मुंबई हायकोर्टाने या आरोपीला जामीन मंजूर केला होता. सध्या हा आरोपी जामिनावर बाहेर आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणात या अल्पवयीन मुलाचे आई, वडील, आजोबा, ससून रुग्णालयातील डॉक्टर यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे. पुरावे नष्ट करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *