बानपच्या मान्सून पूर्व कामांची पोलखोल; 9 कोटी 19 लाख पाण्यात!

बारामती, 29 जुलैः बारामती नगर परिषदेकडून शहर हद्दीत तब्बल 9 कोटी 19 लाख रुपये खर्चून ठेका पद्धतीने फेब्रुवारी 2021 रोजी ठेकेदार योगेश हिंगणे यांना मान्सून पूर्व कामे देण्यात आली आणि किकले असोसिएट्सकडून या कामांची बानपच्या वतीने देखरेख ठेवण्याचे काम करण्यात आले. मात्र ही मान्सून पूर्व कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने पावसाळ्यातील पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागात पाणी साचले. या संदर्भात भारतीय नायक ने 6 जून 2022 रोजी या संदर्भातील बातमीही पोर्टलवरून प्रसिद्ध केली होती. तसेच संबंधित ठेकेदार हिंगणे आणि किकले असोसिएट्सवर कारवाई करण्याची मागणीही आरपीआय (आ) बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी मागणी केली होती.

एकाच पावसाने बारामती नगर परिषदेचे 9 कोटी 19 लाख गेले पाण्यात

त्यानंतर महिनाभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरासह परिसरात मान्सूनने पुनरागमन केले. गेल्या दोन-तीन दिवस बारामती शहरासह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र या पावसाने बारामती नगर परिषदेने मान्सून पूर्व केलेल्या कामांची पोलखोलच करून टाकली. या पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र समोर आले. यात बानप हद्दीतील सिद्धार्थ नगर येथील सम्राट गायकवाड यांच्या घरासमोर तर पावसाच्या पाण्याने तलावच निर्माण झाले होते. यासह शहरातील बारामती नगर परिषदे समोर, चिराग गार्डन समोर, कसबा रोड येथील गणेश आटपडकर यांच्या घरासमोर, एमआयडीसी रोडवरील अक्षय गार्डन हॉटेल समोर, जामदार रोडवरील विठ्ठल प्लाझा, अवधूत नगर येथील टेक्निकल हायस्कूल, बाबूजी नाईक वाडाच्या मागील बाजूस, साठे नगर, सटवाजी नगर, इंदापूर रोडवरील आंबेडकर पुतळ्याच्या जवळ आदी ठिकाणी पाणीच पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यात मोता कलेक्शन शेजारून खाटीक गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक वृद्ध व्यक्तीची दुचाकी पाण्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यात अडकली. सदर दुचाकीचा वेग कमी असल्याने पुढचा अनर्थ टळला.

तसेच संबंधितांकडून काही भागात तर नदीला ड्रेनेज लाईन ही पावसाळी गटराला जोडून पाणी सोडले आहे. तर आमराई भागात ही ड्रेनेजला पावसाळी लाईन जोडली आहे. त्यामुळे पासाचे पाणी आणि मैलायुक्त ड्रेनेजचे पाणी रस्त्यांना साठत आहे. यामुळे ठेकेदार हिंगणे आणि किकले असोसिएट्सवर सरकारी कामाचे नुकसान आणि चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे आरपीआय (आ) चे बारामती शहर सचिव सम्राट अशोक गायकवाड हे कोर्ट जाणार आहे, अशी माहिती त्यांनीच दिली आहे. तसेच बारामती नगरपरिषदेचे 9 कोटी 19 लाख रुपये पाण्यात घालवणाऱ्या दोषींवर कारवाई करणार का? का त्यांना अभय देणार? या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि कन्सल्टंट किकले यांच्यावर कारवाई करतील का? असा सवाल सम्राट गायकवाड यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांना केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *