घरगुती प्रयोगशाळेवर पोलिसांचा छापा; 1 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

मुंबई, 12 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील कांदिवली परिसरात अंमली पदार्थ बनविण्याच्या घरगुती प्रयोगशाळेत मालवणी पोलिसांनी छापा टाकला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 1.17 कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे. कांदिवली परिसरात एका घरगुती प्रयोगशाळेत अंमली पदार्थ तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून या प्रकरणाचा पर्दाफाश केला.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1745621041559527912?s=19

पोलिसांकडून 500 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त

दरम्यान, कांदिवली परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी एका व्यक्तीची चौकशी केली, तेंव्हा त्यांना त्याच्याकडे मेफेड्रोन ड्रग्ज आढळून आले. यावेळी त्या व्यक्तीने पोलिसांना या प्रयोगशाळेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी योजना आखून कांदिवली परिसरातील या घरगुती प्रयोगशाळेवर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी 1 कोटी पेक्षा जास्त किमतीचा 500 ग्रॅम उच्च प्रतीचा मेफेड्रॉन ड्रग्ज आणि हे मेफेड्रॉन ड्रग्ज बनविण्याचे केमिकल, मशिन्स व इतर साहित्य असा एकूण 1 कोटी 17 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी बोरीवलीत मोठी करवाई

तर सध्या या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, 2 जानेवारी रोजी बोरीवली येथे कांदिवलीच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली होती. यावेळी पोलिसांना त्यांच्याकडे अंदाजे 1.18 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 2 किलो 360 ग्रॅम वजनाचे चरस हे अंमली पदार्थ सापडले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *