बुलढाणा, 22 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा व खापरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमातील महाप्रसादातून 208 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. यामधील 201 रुग्णांची प्रकृती सध्या ठीक असून, त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 7 रुग्णांवर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
https://twitter.com/airnews_nagpur/status/1760302136896930085?s=19
घटनास्थळीच रुग्णांवर उपचार!
त्यावेळी एकदशी निमित्त भाविकांना याठिकाणी भगर आणि शेंगदाण्याची आमटी या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. हा महाप्रसाद खाल्ल्याने 208 जणांची प्रकृती बिघडली होती. त्यांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच जवळच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णवाहिका प्रत्यक्ष घटनास्थळावर दाखल झाल्या. यावेळी त्यांनी रुग्णांची संख्या जास्त असल्याने जिथे हरिनाम सप्ताह सुरू होता, त्या मंदिराच्या आवारातच रुग्णांना उपचार दिले. याठिकाणी रुग्णांवर सलाईन दोरीला लटकवून उपचार करण्यात आले. या रुग्णांना तात्काळ उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.
201 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला
सध्या खापरखेडा आणि सोमठाणा येथील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेतील 201 रुग्ण बरे झाले असून, त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, विषबाधा झाल्याने उलट्या जुलाब होऊन रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर, आरोग्य विभागाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या रुग्णांना तातडीने उपचार दिले.