दिल्ली, 13 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज या योजनेअंतर्गत देशातील 10 लाखांहून अधिक घरांना सौर ऊर्जा पुरवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 10 मार्च 2025 पर्यंत देशभरात 10.09 लाख घरांवर सौरऊर्जा यंत्रणा यशस्वीपणे बसविण्यात आली आहे. याची माहिती केंद्र सरकारने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. दरम्यान, सूर्य घर मोफत वीज ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू सुरू करण्यात आली होती. या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश देशातील 1 कोटी घरांना मोफत वीज मिळवून देणे आणि विजेवरील खर्च कमी करणे असा आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने 75 हजार 021 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
https://x.com/PIB_India/status/1899784953719857569?t=lGB41G0o3TaWdUCuySgyWQ&s=19
अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ
दरम्यान, नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 47.3 लाख लोकांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 6.13 लाख लाभार्थ्यांना यशस्वीरित्या अनुदान मिळाले आहे. या अनुदानाची एकूण रक्कम 4 हजार 770 कोटी रुपये आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. www.pmsuryaghar.gov.in या सरकारी वेबसाईटवर अर्ज करणे, विक्रेता निवडणे आणि अनुदान मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि सोपी आहे. ज्यामुळे अनुदानाची रक्कम अर्जदारांच्या बँक खात्यात 15 दिवसांच्या आत जमा केली जाते.
लाखोंचा फायदा होणार
तसेच केंद्र सरकार त्यासाठी 12 सरकारी बँकांमार्फत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज तारण न ठेवता आणि 6.75 टक्के इतक्या कमी व्याजदराने उपलब्ध करून देत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना सौर ऊर्जा पॅनल बसवणे सोपे झाले आहे. या सुलभ कर्जामुळे 3 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प केवळ 15 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत बसवता येतो. या प्रकल्पातून 25 वर्षांत 15 लाख रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. दरम्यान, 3 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यासाठी 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते, त्यामुळे कमी खर्चात लोक वीज बिल वाचवू शकतात आणि पुढील 25 वर्षांत 15 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत 3.10 लाख कर्ज अर्ज आले आहेत. त्यापैकी 1.58 लाख कर्ज मंजूर झाले आहेत. तर 1.28 लाख कर्जांचे वाटप झाले आहे.
2027 पर्यंत 1 कोटी घरांवर सौर ऊर्जा!
पीएम सूर्य घर मोफत वीज या योजनेमुळे सध्या अनेक राज्यांमध्ये सौर ऊर्जा वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः चंदीगड आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांनी सरकारी इमारतींवर छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हे प्रदेश स्वच्छ ऊर्जा वापरण्यात देशात आघाडीवर आहेत. त्याचबरोबर राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू ही राज्ये देखील उत्तम कामगिरी करत आहेत आणि एकूण सौर ऊर्जा पॅनल बसवण्याच्या संख्येत मोठे योगदान देत आहेत. येत्या काळात 2026-27 पर्यंत 1 कोटी घरांपर्यंत सौर ऊर्जा पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.