प्रयागराज, 05 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.05) प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. त्यांनी संपूर्ण देशवासीयांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. स्नानाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भगव्या वस्त्रांमध्ये होते. त्यांच्या हातात आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. त्यांनी संगमात एकट्यानेच डुबकी मारली. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी मंत्रजप व सूर्यपूजा करून त्यांनी गंगेची विधीवत पूजा केली. स्नानानंतर पंतप्रधान मोदी बोटीने घाटावर पोहोचले आणि तेथून थेट दिल्लीला रवाना झाले.
https://x.com/MahaKumbh_2025/status/1887040476664267213?t=IgJ77y5BfdsmIXqDBg4MPQ&s=19
https://x.com/narendramodi/status/1887034581737488589?t=OF6yCzkpp1MAI2TTO0SKeA&s=19
पंतप्रधानांची सोशल मीडियावर पोस्ट
यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर लिहिले की, “प्रयागराज महाकुंभात आज पवित्र संगमात स्नान केल्यावर पूजा-अर्चना करण्याचे भाग्य लाभले. माता गंगेचा आशीर्वाद मिळाल्याने माझ्या मनात अत्यंत शांती आणि समाधान भरून आले. मी त्यांच्याकडे सर्व देशवासीयांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. हर-हर गंगे!”
पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत
तत्पूर्वी, आज प्रयागराज येथे पोहोचताच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, संगम परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बोटीने संगम गाठला. या प्रवासावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बोटीत संवाद झाला.
महाकुंभमेळ्यात करोडो भाविकांचा सहभाग
मोदींच्या दौऱ्यादरम्यान महा कुंभमेळ्यात भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा आज 24 वा दिवस आहे. लाखो भाविक पवित्र स्नानासाठी येथे दाखल होत आहेत. आतापर्यंत करोडो भाविकांनी गंगेत स्नान करून आस्था व्यक्त केली आहे.