नागपूर, 29 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मार्च रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या दौर्यात संरक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे नागपूर आणि विदर्भाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
https://x.com/PTI_News/status/1905557309423845417?t=-oACZpzoYlG5j6B7euPiDQ&s=19
दीक्षाभूमीला भेट
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 9 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘प्रतिपदा’ कार्यक्रमानिमित्त स्मृती मंदिराला भेट देऊन संघ संस्थापकांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर ते दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत.
नेत्रचिकित्सा क्षेत्रातील प्रकल्प
सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर येथील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये 250 खाटांचे आधुनिक रुग्णालय, 14 बाह्यरुग्ण विभाग आणि 14 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत. यामुळे नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नेत्रचिकित्सा सुविधा उपलब्ध होतील. त्यानंतर पंतप्रधान एका जाहीर सभेला संबोधित करतील.
संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पांचे उद्घाटन
दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपुरातील सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. या अंतर्गत अनमॅन्ड एरियल व्हेईकल्ससाठी 1250 मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. या प्रकल्पामुळे संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल.