दिल्ली, 17 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेक तंत्रज्ञानाच्या वाढत्या दुरुपयोगाबाबत चिंता व्यक्त केली आहे. डीपफेकमुळे समाजात प्रचंड अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते. डीपफेक हे भारतीय व्यवस्थेसाठी मोठा धोका असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे लोकांनी यासंदर्भात सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. जनरेटिव्ह एआय द्वारे तयार केलेल्या फोटो किंवा व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे लिहिले पाहिजे की, ते डीपफेक वापरून तयार केले गेले आहेत, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. ते दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात
यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओचे उदाहरण दिले आहे. “मी माझा एआय द्वारे तयार करण्यात आलेला एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये मी गरबा खेळताना दिसत आहे. मात्र मी लहानपणापासून कधीही गरबा खेळलेलो नाही. माझा हा व्हिडीओ खरा असल्यासारखाच दिसत होता.” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींचा गरबा खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत मोदी हे महिलांसोबत गरबा खेळताना दिसत होते. हा व्हिडीओ पंतप्रधान मोदी यांचा असल्याचे म्हटले जात होते. मात्र हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींचा नसून तो अभिनेता विकास महंते यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डीपफेक म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. सध्याच्या काळात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने एखादा व्हिडिओ, फोटो किंवा ऑडिओ एडिट करता येते. उदाहरणार्थ, एखाद्या नेत्याचा किंवा अभिनेत्याचा आवाज आणि चेहरा कोणत्याही व्हिडीओला देऊ शकतो. हे एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवले असल्याने ते खरा आहे की खोटा हे उघड्या डोळ्यांनी पाहून ओळखता येत नाही. यालाच डीपफेक असे म्हणतात.
जालना जिल्ह्यात आज ओबीसींची महाएल्गार सभा
गेल्या काही दिवसांपूर्वी साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. या घटनेचा अनेक सेलिब्रिटींनी तीव्र शब्दांत निषेध केला होता. त्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ हिचा टायगर 3 सिनेमातील एक व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने एडिट करून व्हायरल करण्यात आला होता. याशिवाय सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचा बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे एआयच्या आगमनानंतर डीपफेकचा दुरुपयोग वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
One Comment on “डीपफेक संदर्भात पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता”