मुंबई, 15 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. 15) मुंबईच्या नौसेना डॉकयार्डमध्ये दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे जलावतरण केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वाघशीर या तीन आघाडीच्या नौदल युद्धनौका आणि पाणबुडी राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत पोहोचल्यावर त्यांना नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
https://x.com/AHindinews/status/1879420938187604417?t=ZXZ-l9FYV2wY2CGzUSI3jQ&s=19
https://x.com/AHindinews/status/1879412787753136640?t=XE0RyQAyVUxAV9xqx1ZS6Q&s=19
नौसेनेसाठी महत्वाचा दिवस
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज भारताच्या समुद्री वारशाचा, नौसेनेच्या गौरवशाली इतिहासाचा आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवी शक्ती आणि नवी दृष्टी दिली होती. त्यांच्या पवित्र भूमीवर आज आपण 21 व्या शतकातील नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहोत.”
https://x.com/AHindinews/status/1879414411406033289?t=yi4XuCwRHXFz1DhPqNEYuA&s=19
तिन्ही युद्धनौका एकत्रितपणे कार्यान्वित होण्याची ही पहिलीच वेळ
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत विस्तारवादावर विश्वास ठेवत नाही, तर विकासवादाच्या भावना कायम ठेऊन काम करत आहे. एक विध्वंसक, एक फ्रिगेट आणि एक पाणबुडी हे तीनही एकत्रितपणे कार्यान्वित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिन्ही मेड इन इंडिया आहेत, ही अभिमानाची बाब आहे.”
“भारताची आज संपूर्ण जगात, विशेषत: ग्लोबल साऊथमध्ये, विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळख आहे. पाणी, जमीन, आकाश, खोल समुद्र किंवा अंतराळ या प्रत्येक क्षेत्रात भारत आपल्या हिताचे रक्षण करत आहे आणि सतत सुधारणा केल्या जात आहेत,” असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी यावेळी भारतीय नौदलाच्या शौर्याचेही कौतुक केले, ज्याने अलीकडच्या काही महिन्यांत हजारो लोकांचे प्राण वाचवले आणि लाखो डॉलर्सचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माल सुरक्षित केला. या योगदानामुळे भारतावरील जागतिक विश्वास वाढला आहे, असे ते म्हणाले.