भागलपूर (बिहार), 24 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.24) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. बिहारमधील भागलपूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात तब्बल 22 हजार कोटी रुपयांचा लाभ (डीबीटी) स्वरूपात देशातील 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामध्ये 2.41 कोटी महिला शेतकरी देखील लाभार्थी आहेत. याची माहिती केंद्र सरकारने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
https://x.com/PIB_India/status/1893978903368360112?t=4o7HxUDt5NI69NejXv_yUg&s=19
18 व्या हप्त्याचे वितरण वाशिम येथे
यापूर्वी, 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथे पीएम-किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. या वेळी 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती.
शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजारांचा लाभ
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत देशभरातील लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे ही रक्कम वितरित केली जाते.
https://x.com/narendramodi/status/1893875755483824409?t=-365bX4IBUpd2XcAdSnVBQ&s=19
पीएम-किसानला 6 वर्षे पूर्ण!
दरम्यान, देशातील शेतकऱ्यांना निधी आणि सन्मान देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आज 6 वर्षं पूर्ण झाल्याबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. “पीएम-किसान योजनेला 6 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील माझ्या शेतकरी बंधू-भगिनींचे खूप खूप अभिनंदन. माझ्यासाठी अत्यंत समाधान आणि अभिमानाची बाब आहे की, आतापर्यंत सुमारे 3.5 लाख कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आमचा हा प्रयत्न अन्नदात्यांना सन्मान, समृद्धी आणि नवीन ताकद देत आहे.” असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.