दिल्ली, 22 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा 19 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारच्या भागलपूर येथून पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरण करतील. यावेळी संपूर्ण देशातील सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार 20,000 कोटी रुपयांचा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणार आहे. अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
https://x.com/ChouhanShivraj/status/1892863830323077563?t=YnN9ZdTWTV–lO_8QBLdoA&s=19
योजनेबद्दलची माहिती –
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये मिळतात. प्रत्येक हप्ता 4 महिन्यांच्या अंतराने देण्यात येतो. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2,000 रुपयांचा हप्ता मिळतो. देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक पाठबळ मिळत आहे.
यापूर्वीचा हप्ता ऑक्टोंबरमध्ये मिळाला
तत्पूर्वी, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोंबर 2024 रोजी जारी करण्यात आला होता. त्यावेळी वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्या अंतर्गत एकूण 20 हजार कोटी रुपये देशातील सुमारे 9.4 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. त्यानंतर आता पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरीत करण्यात येणार आहे.