दिल्ली, 04 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) टी-20 विश्व विजेता भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी भारतीय संघातील खेळाडू लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दीड मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि टीम इंडियाचे खेळाडू एकमेकांशी मनमोकळे पणाने संवाद साधताना दिसत आहेत.
https://x.com/PIB_India/status/1808771862312468712?s=19
पंतप्रधानांच्या भेटीचे फोटो व्हायरल
याप्रसंगी, संघातील खेळाडूंनी टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफीची पंतप्रधानांच्या हातात दिली. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू बसने हॉटेलकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी जिंकून देशात परतलेल्या भारतीय संघाची आज मुंबईत रॅली पार पडणार आहे. त्यासाठी भारतीय संघातील खेळाडू मुंबईकडे रवाना होणार आहेत. ही रॅली खुल्या बसमध्ये होणार असून, ती सायंकाळी 5 वाजल्यापासून नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या सुमारे दीड किलोमीटरच्या मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
वानखेडे स्टेडियमवर विशेष कार्यक्रम
या रॅली नंतर बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार करून त्यांना बीसीसीआय कडून बक्षीस रक्कम दिली जाईल. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तत्पूर्वी, टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघ आज सकाळी विशेष विमानाने दिल्ली विमानतळावर पोहोचला. त्यानंतर दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी भारतीय संघाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी विमानतळावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.