पुणे, 10 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) तुम्ही जर फिरण्यासाठी बाहेरगावी जायचा विचार करीत असाल तर, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. येत्या 7 ते 10 दिवसांत राज्यातील हवामान चांगले राहील. त्यामुळे येत्या काही दिवसांत तुम्ही हवामानाची कसलीही काळजी न करता राज्यात कुठेही फिरण्यासाठी बिन्धास्तपणे जाऊ शकता, असे हवामान विभागाने म्हटले आहे. यासंदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी ट्विट करून दिली आहे.
https://twitter.com/anupamkashyapi/status/1733443199518060590?s=19
“तुम्ही महाराष्ट्रात सुट्टीसाठी किंवा पुण्यात बाहेरच्या कार्यक्रमाचे नियोजन करत आहात का? होय, तुम्ही पुढील 7 ते 10 दिवसांत सुट्टीसाठी बाहेरगावी फिरण्यास जाऊ शकता. यासाठी हीच वेळ उत्तम आहे. या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि आकाश निरभ्र राहील. तसेच या दिवसांत राज्यात थोडीशी थंडी जाणवेल. सोबतच पहाटे आणि धुके पडतील. या वातावरणाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. त्यामुळे येत्या 7 ते 10 दिवसांत तुम्ही बाहेरगावी सहलीचा बेत आखला असेल तर तुम्हाला छान वाटेल,” असे अनुपम कश्यपी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यामुळे राज्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर आता अवकाळी पाऊस थांबला आहे. राज्यात सध्या थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पहाटेपासून दाट धुके पडत आहे. त्यामुळे अशा वातावरणात सध्या मॉर्निंग वॉक करण्यासाठी अनेक लोक सकाळी घराबाहेर पडताना दिसत आहेत.