पुणे, 19 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी-चिंचवड परिसरातील हिंजवडी येथील एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी (दि.19) सकाळी ही घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हे मृत कर्मचारी व्योमो ग्राफिक्स कमनीचे कर्मचारी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
https://x.com/ANI/status/1902208617690071167?t=dzFENNS8T2ZjKnE6AEiWmw&s=19
अशी घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खाजगी कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर कर्मचाऱ्यांना घेऊन ऑफिसकडे जात होता. सकाळच्या सुमारास हे वाहन हिंजवडीतील डसॉल्ट सिस्टिम्सजवळ पोहोचले असताना अचानक त्याने पेट घेतला. वाहनाला आग लागल्याचे लक्षात येताच, चालकाने तत्काळ वेग कमी करून वाहन थांबवले. त्यानंतर चालकाने आणि काही कर्मचाऱ्यांनी तत्काळ वाहनाबाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला. परंतु यादरम्यान काहीजण आतमध्ये अडकले आणि त्यावेळी आगीच्या ज्वाळांमुळे चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
पोलीस तपास सुरू
या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. त्यामुळे तपासानंतरच या दुर्घटनेचे खरे कारण समोर येईल. या घटनेमुळे खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.