दिल्ली, 07 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ मंगळवारपासून (8 एप्रिल) लागू होणार आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज उत्पादन शुल्क दरात वाढ केल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये वाढ होणार नाही. त्यामुळे देशातील जनतेसाठी ही दिलासादायक बाब आहे.
https://x.com/HPCL/status/1909202566065381651?t=5Pda9bq0p5tfj-QT1MqYFQ&s=19
https://x.com/PetroleumMin/status/1909186067334361590?t=o44fQLpI2fbcmqmSxKooAQ&s=19
उत्पादन शुल्कात वाढ
सध्या पेट्रोलवर 19.90 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क आकारले जाते. आता ते वाढवून 21.90 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. डिझेलवरील शुल्क 15.80 रुपयांवरून वाढवून 17.80 रुपये प्रति लिटर केले आहे. सरकारकडून ही शुल्कवाढ थेट ग्राहकांकडून वसूल न करता तेल कंपन्यांवरच ही आर्थिक जबाबदारी टाकली जाणार आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण
दिल्लीमध्ये सध्या पेट्रोलचा दर 94.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 87.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.15 रुपये आहे. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती अलीकडे कमी झाल्या आहेत. पूर्वी प्रति बॅरल 70 डॉलर असलेले दर आता घसरून 63 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. यामुळे येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचा अंदाज आहे. तेलाच्या किमतीत झालेल्या या मोठ्या प्रमाणात घसरणीमुळे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.