बारामती, 9 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय हे बारामतीतील गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी ‘दिवाळी पाडवा’ सहकुटुंब एकत्र येऊन साजरा करतात. त्यावेळी गोविंदबागेत राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आणि नागरिक हे पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मात्र यंदाच्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकांना भेटणार नाहीत. याची माहिती अजित पवारांनी सोशल मीडियावरून दिली आहे. आजारपणामुळे आपण दिवाळी पाडव्याच्या दिवशी लोकांना भेटणार नसल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कोणाची? याबाबत आज सुनावणी
“गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो.” असे अजित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी घेतला नितीश कुमार यांचा समाचार
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी दिली होती. तेंव्हापासून अजित पवार यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यामुळे अजित पवार यांना मराठा आरक्षणाच्या बैठकांना देखील उपस्थित राहता आले नव्हते. तत्पूर्वी, राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर यंदाची ही पहिलीच दिवाळी आहे. यामुळे या दिवाळी पाडव्याच्या दिवशी अजित पवार हे गोविंदबागेत हजर राहणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर अजित पवार यांच्या या पोस्टमुळे ते यंदा गोविंद बाग येथे पवार कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
One Comment on “यंदाच्या दिवाळीत लोकांना भेटता येणार नाही – अजित पवार”