मुंबई, 22 मे: (विश्वजीत खाटमोडे) एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. याबाबतची माहिती माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी एका निवेदनातून दिली आहे. प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करून देण्याच्या देण्याच्या उद्देशाने एसटीने आपल्या npublic.msrtcors.com अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच मोबाईलवरील MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येत आहे. एसटीने सुरू केलेल्या या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून गेल्या 5 महिन्यात 12 लाख 92 हजार इतक्या तिकिटांची विक्री झाल्याचे अभिजीत भोसले यांनी सांगितले.
https://twitter.com/msrtcofficial/status/1793221018015908270?s=19
रोज 10 हजार तिकिटांची विक्री
प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट काढता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 1 जानेवारी 2024 पासून नवी ऑनलाईन आरक्षण प्रणाली सुरू केली होती. या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून 1 जानेवारी ते 20 मे पर्यंत 12 लाख 92 हजार इतक्या तिकीटाची विक्री झाली आहे. याच काळात मागील वर्षी 9 लाख 75 हजार तिकीटांची विक्री झाली होती. म्हणजेच, मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे 3 लाखाने जास्त आहे. सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून दररोज 10 हजार तिकीटे काढली जात आहेत.
महामंडळाची महत्त्वाची माहिती
या नव्या प्रणालीमध्ये वेबसाईट आणि ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिकीट काढण्याच्या प्रणालीच्या दोन्ही पद्धतीमध्ये 1 जानेवारी 2024 पासून अमुलाग्र बदल करून त्या अदयावत करण्यात आल्या. परिणामी, त्यातील अनेक दोषांचे निर्मुलन झाल्याने सदर ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली असल्याची माहिती अभिजीत भोसले यांनी निवेदनातून दिली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीमध्ये प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे देखील आगाऊ आरक्षण मिळु शकते. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation ॲपचा वापर प्रवाशांनी करावा, असे आवाहन अभिजीत भोसले यांनी केले आहे.