नवी मुंबई, 26 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी आज नवी मुंबईतील वाशी येथे मराठा बांधवाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. मराठा आरक्षण जोवर मिळत नाही, तोवर सर्व मराठा मुलामुलींना मोफत शिक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच राज्य सरकारने सग्यासोयऱ्यांच्या संदर्भातील अध्यादेश आज रात्रीपर्यंत काढावा, अन्यथा आम्ही उद्या आझाद मैदानात जाणार आहोत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे – जरांगे
अंतरवाली सह महाराष्ट्रातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली होती. यासंदर्भात गृह विभागाने गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. या आदेशाचे पत्र आम्हाला पाहिजेत, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. क्युरीटीव्ही पिटीशनचा विषय सध्या सुप्रीम कोर्टात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगे सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला तर, मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली होती. तसेच आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरत्या करायच्या नाहीत आणि जर तुम्हाला भरती प्रक्रिया करायची असेल तर तेंव्हा मराठा समाजासाठी राखीव जागा ठेवा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र सरकारने मुलींना केजी टू पीजी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना मात्र यातून सोडून दिले आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजातील सर्वांना मोफत शिक्षण द्यावे आणि सरकारी भरतीत मराठ्यांच्या जागा राखीव ठेवा. या संदर्भातील अध्यादेश सरकारने आज रात्रीपर्यंत जारी करावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली आहे.
आज रात्रीतून अध्यादेश काढा अन्यथा उद्या आझाद मैदानात जाणार!
सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येसह सरकार अध्यादेश काढणार आहे. त्यावर सर्व सचिवांनी सह्या केल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सह्या केल्या आहेत. असे सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांनी माहिती दिल्याचे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. एवढं झालंय तर मग अध्यादेश का काढला नाही? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. तसेच सरकारने त्यासंदर्भातील अध्यादेश आज रात्री पर्यंत द्यावा. वाटलंच तर आजची रात्री आम्ही येथेच काढतो. आम्ही आज 26 जानेवारीचा आणि कायद्याचा सन्मान करून आज आझाद मैदानाकडे जात नाही. पण आम्ही मुंबई सोडणार नाही. प्रशासनाचा सन्मान करतो. तुम्ही एवढं केलंय तर अध्यादेश द्या. तुम्ही आज रात्री नाही दिलं तर उद्या आझाद मैदानात जाणार आहोत, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.