पॅरिस ऑलिंपिक: नीरज चोप्राने पटकावले रौप्य पदक! भारताच्या खात्यात पाच पदके जमा

पॅरिस, 09 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले रौप्य पदक आहे. त्यामुळे पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आता 5 पदके जमा झाली आहेत. त्यासोबतच नीरज चोप्रा हा सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरूष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, 2021 मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले होते. परंतु, त्याला पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

https://x.com/WeAreTeamIndia/status/1821635443261403220?s=19

पाकिस्तानच्या खेळाडूने जिंकले सुवर्णपदक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गुरूवारी झालेल्या सामन्यात भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले. यावेळी नीरज चोप्रा याने 89.45 मीटर भाला फेकला. या मोसमातील नीरजची ही सर्वोत्तम कामगिरी होती. तर या सामन्यात पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले. तसेच ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटर भाला फेकून तिसरे स्थान पटकावले. त्याला कांस्यपदक मिळाले आहे.

https://x.com/narendramodi/status/1821637174871388231?s=19

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

दरम्यान, रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे. “नीरज चोप्रा हे उत्कृष्टतेचे जिवंत उदाहरण आहेत. त्याने आपली प्रतिभा वेळोवेळी दाखवली आहे. त्याला पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये यश मिळाल्याचा भारताला आनंद आहे. रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. तो असंख्य आगामी खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशाला अभिमानास्पद करण्यासाठी प्रेरणा देत राहील,” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारताच्या खात्यात पाच पदके!

तत्पूर्वी, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली आहेत. यामध्ये चार कांस्य आणि एक रौप्यपदक यांचा समावेश आहे. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये भारताला सर्वप्रथम कांस्यपदक मिळवून दिले. त्यानंतर मनू भाकरने पुन्हा एकदा सरबज्योत सिंगसोबत नेमबाजीतील मिश्र गटात स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. त्यानंतर स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. तसेच या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले. तर आता नीरज चोप्राने भालाफेक मध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *