बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा 6 हजार 553 मतांनी पराभव

बीड, 05 जून: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अटीतटीच्या ठरलेल्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा 6 हजार 553 मतांनी पराभव केला आहे. दरम्यान, ही मतमोजणी सुरू झाल्यानंतर यामध्ये कधी बजरंग सोनवणे पुढे होते, तर कधी पंकजा मुंडे पुढे होत्या. मात्र, अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये पंकजा मुंडे मागे पडल्या. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. परंतु, निवडणूक आयोगाने त्यांची ही मागणी मान्य केली नाही. अखेरीस बजरंग सोनवणे यांना बीडमध्ये 6 हजार 553 मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

https://twitter.com/NCPspeaks/status/1798082904821805242?s=19

पाहा मतदानाची आकडेवारी

बीड लोकसभा मतदारसंघात या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत बजरंग सोनवणे यांना एकूण 6 लाख 83 हजार 950 मते मिळाली. त्यांच्या या मिळालेल्या मतदानाची टक्केवारी 44.93 टक्के इतकी होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांना एकूण 6 लाख 77 हजार 397 मते मिळाली. यावेळी पंकजा मुंडे यांना मिळालेल्या मतदानाची टक्केवारी 44.5 इतकी होती. याशिवाय या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बहुजन महा पार्टीचे उमेदवार अशोक थोरात यांना एकूण 54 हजार 850 मते मिळाली आहेत. तर चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अशोक हिंगे यांनाही 50 हजार 867 मते पडली. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानामुळे बीड मधील ही निवडणूक अटीतटीची झाली आहे.

मराठा आंदोलनाचा फटका?

दरम्यान, पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षण आंदोलनामुळे पराभवाचा सामना करावा लागला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बीडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. तसेच त्याठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला होता. याचाच फटका पंकजा मुंडे यांना बसला असल्याचे म्हटले जात आहे. तर पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *