मुंबई, 01 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आज त्यांच्या 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनावणे यांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत झालेल्या या पराभवानंतर भाजपकडून पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केले जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. अखेर भाजपने विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना आज उमेदवारी दिली आहे.
https://x.com/AHindinews/status/1807709617910145238?s=19
या पाच नेत्यांना उमेदवारी
तत्पूर्वी, भाजप पक्षातील अनेक नेते विधान परिषदेसाठी इच्छुक होते. परंतु, भारतीय जनता पार्टीकडून आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच नेत्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांच्यासह योगेश टिळेकर, डॉ.परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
12 जुलै रोजी मतदान
दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी 11 जागांसाठी मतदान होणार आहे. येत्या 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 2 जुलैपर्यंत उमेदवारांना आपला अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी 3 जुलै रोजी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 5 जुलैपर्यंत असणार आहे. त्यानंतर 12 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. या संदर्भातील माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.