बारामती, 09 मे: (अभिजित कांबळे) बारामती तालुक्यातील पळशी गावच्या ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकाने बांधकाम कामाच्या बिलासाठी लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अतुल रामदास भिलारे (वय 41 वर्षे, व्यवसाय – बांधकाम ठेकेदार, रा. भिलारवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांनी बारामती तालुक्यातील पळशी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले ग्रामसेवक कांतीलाल बापुराव काळाणे (वय 57 वर्षे, रा. फ्लॅट नं. 5, पारिजात अपार्टमेंट, फेज 1, भिगवण रोड, बारामती) यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
काय आहे प्रकरण?
त्यांच्या तक्रारीनुसार, दिनांक 7 मे 2025 रोजी सकाळी 8:43 ते 11:25 या वेळेत पळशी येथील पाण्याच्या टाकीजवळील सार्वजनिक रस्त्यावर सदर आरोपी ग्रामसेवकाने मळई माता मंदिराजवळील साठवण सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचे मंजूर बिल तसेच उर्वरित 10% रक्कम म्हणजेच अंदाजे 1,50,000 रुपये मिळवून देण्यासाठी फिर्यादीकडून सुरुवातीस 30,000 रुपयांची रुपयांची मागणी केली. पुढे तडजोडीअंती 25,000 रुपये पंचासमक्ष आरोपीने अल्टो गाडी (क्र. एमएच 14 सीके 1796) मध्ये स्वीकारले.
गुन्हा दाखल
त्यांच्या या तक्रारीवरून ग्रामसेवक कांतीलाल काळाणे यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, संबंधित गुन्ह्याचा वर्दी अहवाल बारामती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय येथे सादर करण्याची तयारी सुरू आहे. सदर प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल भोसले हे करीत आहेत. तर याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
शासकीय कामांतील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह
दरम्यान, बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये विविध शासकीय कामांसाठी नागरिकांकडून लाच मागितल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. बारामती तालुक्यात शेकडो ग्रामसेवक व कर्मचारी कार्यरत असून, त्यापैकी काहीजण भ्रष्टाचाराच्या गोष्टींमध्ये अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी मागील काही वर्षांत बारामती तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांविरोधात अनेक कारवाया केल्या असून, त्यात काहींना रंगेहाथ पकडलेही गेले आहे. यामुळे ग्रामपंचायतीतील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, शासनाने यंत्रणांवर निगराणी वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, पळशी येथील ग्रामसेवकाविरोधात दाखल झालेल्या सद्य प्रकरणामुळे पुन्हा एकदा या विषयावर जनतेत चर्चा सुरू झाली आहे.