दिल्ली, 26 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनाही पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यासोबतच महाराष्ट्रातील 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
https://x.com/ANI/status/1883179779287089511?t=GajW-nA-EMrgcGZRfOf6Vw&s=19
https://x.com/PIBMumbai/status/1883199219735150677?t=wipZJU1Bmj1e-LPAutR9bA&s=19
दरम्यान, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाही शनिवारी (दि.25) पद्म पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये देशातील 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 19 मान्यवरांना पद्म भूषण आणि 113 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यंदाच्या पुरस्कारांमध्ये 23 महिलांना आणि 10 परदेशी नागरिकांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, 13 मान्यवरांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते
महाराष्ट्रातील कला, साहित्य, कृषी, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत. त्यामध्ये खालील मान्यवरांचा समावेश आहे.
1. सुलेखनकार अच्युत पालव – कला क्षेत्रातील योगदानासाठी
2. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ – मराठी चित्रपटसृष्टीतील कार्यासाठी
3. शास्त्रीय गायक अश्विनी भिडे देशपांडे – संगीत क्षेत्रातील योगदानासाठी
4. पार्श्वगायिका जस्पिंदर नरुला – गायन क्षेत्रातील योगदानासाठी
5. बासरी वादक रानेंद्र भानू मजुमदार – संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी
6. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत – चित्रकलेतील योगदानासाठी
7. अरुंधती भट्टाचार्य – व्यापार व उद्योग क्षेत्रातील कार्यासाठी
8. चैत्राम पवार – पर्यावरण आणि वनसंवर्धन क्षेत्रातील कार्यासाठी
9. मारोती चीतमपल्ली – साहित्य आणि वन्यजीव अभ्यास क्षेत्रातील योगदानासाठी
10. सुभाष शर्मा – कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी
11. विलास डांगरे – वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी